गुजरातमध्ये भाजपने ९९ जागांवर आघाडी घेतली आहे. ज्यापैकी ६० पेक्षा जास्त जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तसेच गुजरातमध्ये भाजपला संपूर्ण बहुमतासह सत्ता स्थापता येणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.अशात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. गुजरातमध्ये घराणेशाहीचा पराभव झाला आणि विकासाला लोकांनी मतदान दिले असे अमित शहा यांनी थोड्याचवेळी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. विकास वेडा झाला आहे म्हणत आमच्या धोरणाची खिल्ली उडवण्यात आली. मात्र गुजरात आणि हिमाचलच्या जनतेने काँग्रेसला उत्तर दिले आहे असा टोला अमित शहा यांनी लगावला.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांच्यासह सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला चांगला विजय मिळवून दिला याबाबत त्यांनी गुजरातच्या जनतेचेही आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व दोन्ही राज्याच्या जनतेने मान्य केले आहे असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये ३० पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. तर राहुल गांधी यांनी विकासाचा मुद्दा खोडून काढत जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती. तर भाजपने विकास हा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर टीका केली. मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडल्या. आता विजय मिळाल्यावर अमित शहा यांनी हा घराणेशाहीवर मिळालेला विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकाही आम्ही अशाच प्रकारे जिंकू असाही विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.