रियाध : सौदी अरेबियात प्रतिष्ठेची आर्थिक परिषद सुरू झाली असून त्यावर खाशोगी खून प्रकरणाची  छाया आहे. जमाल खाशोगी या पत्रकाराची सौदी अरेबियाने हत्या केल्याच्या निषेधार्थ अमेरिका व युरोपातील पत्रकारांनी तसेच अमेरिका काँग्रेस सदस्यांनी या परिषदेवर बहिष्काराचा निर्णय आधीच जाहीर केला होता.

सौदी अरेबियाचे राजे महंमद बिन सलमान यांनी अधिक परदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी ही परिषद आयोजित केली असून गेल्या वर्षी अशाच परिषदेमुळे सौदी अरेबियात मोठी गुंतवणूक झाली होती. सौदी अरेबियाने दोन आठवडे खाशोगी याच्या बेपत्ता होण्याबाबत मौन पाळले होते व नंतर तुर्कस्थानमधील इस्तंबूलच्या सौदी दूतावासात अधिकाऱ्यांशी बाचाबाचीत त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. परंतु सौदी अरेबियाने त्याचा छळ करून खून केल्याचे सांगितले जात आहे कारण खाशोगी हा सलमान यांचा मित्र असला तरी त्यांच्या विरोधात लिखाण करीत होता.

दरम्यान रियाध येथे गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन होत असताना सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री खालीद अल फलीह यांनी खाशोगी यांच्या मृत्यूची घटना घृणास्पद असल्याचे सांगितले. या परिषदेत कु णाचेही बीजभाषणच झाले नाही कारण २ ऑक्टोबरला खाशोगी याचा खून झाल्याच्या निषेधार्थ अनेक देशांनी बहिष्कारच टाकला होता. आमच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे अशी कबुली फलिह यांनी दिली. सौदी अरेबियातील कुणीही खाशोगीच्या मृत्यूचे समर्थन करीत नाही, देशाच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्वानाच झाल्या घटनेबाबत अस्वस्थता वाटते आहे असे ते म्हणाले.

बहिष्कार असूनही एकूण ५० अब्ज डॉलर्सचे करार यात झाले. रशिया व आशियातील काही देश सौदी अरेबियाशी व्यापार वाढवण्यात आघाडीवर आहेत. राजे सलमान यांनी सौदी अरेबिया आधुनिक इस्लामचा अंगिकार करीत असल्याचे सांगून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ५०० अब्ज डॉलर्स खर्च करून भविष्यवेधी शहर उभारण्याची घोषणा केली. सौदी महिला उद्योगपती लुबना ओलायन यांनी एका सत्राचे सूत्रसंचालन करताना खाशोगीच्या मृत्यूचा उल्लेख केला अशी कृत्ये आमच्या रक्तात नाहीत असे त्या म्हणाल्या पण जे घडले त्याबाबत वेदना प्रकट केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यावेळी उपस्थित होते.

सत्य बाहेर यावे – थेरेसा मे

लंडन : इस्तंबूलमधील सौदीच्या वकिलातीमध्ये पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली त्यामागील सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केली आहे. खाशोगी यांच्या हत्येचा शक्य तितक्या कडक शब्दांत निषेध करावा यासाठी संपूर्ण सभागृह आपल्याला पाठिंबा देईल. नक्की काय घडले त्यामागील सत्य उजेडात आलेच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सौदीचे उत्तर असमाधानकारक – ट्रम्प

वॉशिंग्टन : तुर्कीतील सौदीच्या वकिलातीमध्ये पत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू झाला त्याबाबत सौदीने दिलेल्या स्पष्टीकरणाने आपले समाधान झाले नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचा एक गट सौदी अरेबियामध्ये आहे, तर दुसरा तपास गट तुर्कीमध्ये असून ते या प्रकरणाबाबतची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आपल्याला जी माहिती देण्यात आली त्याने आपले समाधान झालेले नाही, असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसबाहेर पत्रकारांना सांगितले. मात्र आमच्याकडे अत्यंत चाणाक्ष अधिकारी आहेत. ते एक-दोन दिवसांत खरी माहिती घेऊन येतील, असेही ते म्हणाले.