कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं असून, शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे.

नवीन कृषी कायदे रद्द करा, असं म्हणत दोन महिन्यांपूर्वी पंजाब, हरयाणासह देशातील विविध ठिकाणाहून शेतकऱ्यांना दिल्लीला धडक दिली होती. मात्र, शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं. तेव्हापासून सिंधू, टिकरी आणि गाझीपूर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसाचाराच्या आरोपानंतर शेतकरी आंदोलन आणखी पेटलं असून, आता त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटू लागले आहेत.

आणखी वाचा- “कारण ते दहशतवादी…”, इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने कंगनाचा संताप

इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानापाठोपाठ तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनाकडे जगाचं लक्ष वेधणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?

रिहानानंही शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत?, असा सवाल तिने ट्विटद्वारे केला आहे.

याचबरोबर भारतीय पर्यावरणासाठी काम करणारी कार्यकर्ता लिसिप्रिया कंगुजम हिनेही काही दिवसांपूर्वी ट्विट करून जाहीरपणे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नकार दिल्याने कंगुजम चर्चेत आली होती.