अयोध्या येथील बाबरी मशीद उद्धवस्त केल्यानंतर त्या जागेवर पूर्वी राम मंदिर असल्याचा हिंदूंनी दावा केला आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून या जागेसाठी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद सुरु आहे. मात्र, आता या जागेवर पूर्वी बुद्ध विहार असल्याचे सांगत बौद्धांनीही दावा केला आहे. या जागेवर अनेक वेळा पुरातत्व खात्याकडून झालेल्या उत्खननात बौद्ध संस्कृतीशी संबंधी अवशेष आढळून आले आहेत. या संशोधनाचा आधार घेत बौद्धांनी आता या जागेवर दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

बौद्धांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत विनीतकुमार मौर्य यांनी दावा केला आहे की, अयोद्ध्येतील वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर नव्हे तर बुद्ध विहार होते. त्यामुळे या जागेवर आमचाही हक्क आहे. मात्र, कोर्टाच्या मुख्य खंडपीठाकडे सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरु असल्याने नव्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

मौर्य यांनी म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व विभागाकडून या जागेभोवती ५० ठिकाणी संशोधनासाठी चार वेळेस खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामांमध्ये हिंदू मंदिरांचे कुठलेही अवशेष आढळून आलेले नाही, उलट बुद्ध विहाराचे अवशेष येथे सापडले आहेत. इथल्या खोदकामात बौद्ध शिलालेख, स्तूप आणि भिंतींचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे बाबरी मशीदीच्या निर्मितीपूर्वी या जागेवर बुद्ध विहार असल्याचे सिद्ध होते, त्यामुळे यावर बौद्धांचाही हक्क आहे.

बाबरी मशिदीसाठी मुस्लिम, राम मंदिराचा दावा करीत हिंदू आणि आता बुद्ध विहाराचा दावा करीत बौद्ध समाजाने या वादग्रस्त जागेवर हक्क सांगितल्याने हे प्रकरण अधिकच किचकट बनले आहे. मात्र, या जागेसंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, ‘मंदिर वही बनाऐंगे’ या घोषणेने हिंदू समाजाने हा मुद्दा लावून धरला आहे. तर ही वक्फ बोर्डाची जागा असल्याचा दावा करीत मुस्लिम समाज ही जागा राम मंदिरासाठी कोणालाही न देण्यावर ठाम आहेत.