करारावर स्वाक्षऱ्या

दहशतवादाबाबतच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतच्या करारावर गुरुवारी भारत आणि अमेरिकेने स्वाक्षऱ्या केल्या. ज्ञात आणि संशयित दहशतवाद्यांबाबतची व्यक्तिगत माहिती देण्याचाही त्यामध्ये समावेश आहे.
केंद्रीय गृहसचिव राजीव मेहरिषी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार भारत आणि अमेरिका एकमेकांना नियोजित ठिकाणांहून दहशतवादी छाननीची माहिती उपलब्ध करून देणार आहेत. या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातले दहशतवाद प्रतिबंधक सहकार्य वाढणार आहे.
या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याने आता भारताने औपचारिकपणे अमेरिकेच्या एचएसपीडी-६ मध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे अमेरिकेने तयार केलेल्या ज्ञात आणि संशयित दहशतवाद्यांची व्यक्तिगत माहिती आता भारताला उपलब्ध होणार आहे.
या करारावर स्वाक्षऱ्या होण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि त्यानंतर दोन्ही देशांनी महत्त्वाच्या मुद्दय़ांवरील मतभेद दूर करून करार केला. अमेरिकेने यापूर्वी ३० देशांसमवेत असा करार केला आहे.