आज निकाल; दुपापर्यंत चित्र स्पष्ट होणार

भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य तसेच काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, निकालाचे राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होणार आहेत. गुजरातमुळे काहीशा झाकोळलेल्या हिमाचल प्रदेशमध्येही आजच मतमोजणी होणार आहे.

मतदानोत्तर चाचण्यांनी गुजरातमध्ये भाजप सलग सहाव्यांदा विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला आहे. तर पाटीदार आरक्षण आंदोलन, शेतकरी व व्यापाऱ्यांमधील नाराजी मतदानयंत्रांतून उमटेल आणि आपण तब्बल २२ वर्षांनंतर सत्तेत येऊ, अशी आशा कॉंग्रेसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारधडाक्याने सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे राहिले. पंतप्रधानांनी प्रचारात राम मंदिराचा मुद्दा, पाकिस्तानचा हस्तक्षेप, मणिशंकर अय्यर यांनी केलेली टिप्पणी हे मुद्दे उचलून धरत मतदारांना भावनिक आवाहन केले होते. राहुल गांधी यांनी गुजरात विकास प्रारूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. राहुल यांच्या मंदिर भेटीचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरला.

काँग्रेसने पाटीदार नेता हार्दिक पटेल, ओबीसींचा नेता अल्पेश ठाकोर व दलित नेते जिग्नेश मेवाणी अशा सर्व समाजघटकांना सोबत घेत व्यापक आघाडी निर्माण केली. विशेष म्हणजे राज्यात १२ टक्के असलेला पाटीदार समाज ही भाजपची हक्काची मतपेढी. मात्र, आरक्षणाच्या मुद्दय़ावरून हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देत भाजपची चिंता वाढविली. मात्र, भाजपने शेवटच्या टप्प्यात आक्रमक प्रचार केला. त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्या देत असले तरी आपणच विजयी होणार असा दावा कॉंग्रेसने केला आहे. यामुळे गुजरातचा कौल कुणाला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

तक्रारीनंतर वायफाय सेवा बंद

सुरतमधील कामराज मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या तक्रारीवरून मतदान यंत्रे ठेवलेल्या महाविद्यालय परिसरातील वायफाय सेवा बंद करण्यात आली. मतदानयंत्रांत फेरफार करण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेस उमेदवार अशोक जरीवाला यांनी केला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वायफाय  बंद केले असे जरीवाला यांनी स्पष्ट केले.

मतदान यंत्र फेरफाराचा हार्दिकचा आरोप

सुरत: अहमदाबादस्थित एका कंपनीचे १५० अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप हार्दिक पटेल याने केला आहे. पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट आहे. देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, अशी ट्विप्पणी हार्दिकने केली आहे.

७० टक्के फेरमतदान

अहमदाबाद : गुजरातमधील चार मतदारसंघातील सहा मतदान केंद्रांवर रविवारी ७० टक्के फेरमतदान झाले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर वडगम व सावेली मतदारसंघातील प्रत्येकी दोन मतदान केंद्रांवर तर विरामगम व दसका्रई मतदारसंघात एका ठिकाणी हे फेरमतदान झाले. फेरमतदानाचे नेमके कारण आयोगाने स्पष्ट केले नाही.

३७ मतमोजणी केंद्रे

राज्यातील ३३ जिल्ह्य़ांमध्ये ३७ केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी आहे. १८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत दोन टप्प्यांत सरासरी ६८.४१ टक्के मतदान झाले होते.