अद्रमुकने आरोप फेटाळला
तमिळनाडूतील चेन्नई येथे आलेल्या पुरानंतर जे मदतकार्य चालू आहे त्यातील मदत साहित्यावर मुख्यमंत्री जयललिता यांच्या नावाने अम्मा स्टीकर्स लावण्याची सक्ती अद्रमुक कार्यकर्त्यांंनी स्वयंसेवी संस्थांना केल्याच्या तक्रारी आहेत. अद्रमुकने मात्र असे काही केल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे.
अद्रमुक कार्यकर्ते मदत साहित्यावर अम्मा स्टीकर्स लावण्याची सक्ती करीत असल्याची माहिती समाजमाध्यमांवरून ती सगळीकडे पसरली. त्यानंतर अद्रमुकने त्या विरोधातील संदेश पाठवून आम्ही तशी सक्ती केली नसल्याचे म्हटले आहे. समाजमाध्यमात करण्यात आलेले दावे चुकीचे असून जर कुणाची तक्रार असेल तर पक्ष मुख्यालय किंवा पोलिसांकडे तक्रार करावी असे अद्रमुकने म्हटले आहे. अद्रमुकच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मदत साहित्यावर अम्मा स्टीकर्स लावण्याची सक्ती आम्ही केलेली नाही ती अफवा असून काही हितशत्रूंनी ती माहिती पसरवली आहे. मदत साहित्यावर अम्मा स्टीकर्स चिकटवण्याची आम्हाला गरज नाही. आमचे कार्यकर्ते अगोदरच पूरग्रस्तांसाठी काम करीत आहेत व मदत कार्यात सहभागी आहेत. तिरुवल्लुर-तिरुत्तानी रस्त्यावर मदतीचा ट्रक अडवून काही लोकांनी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून अम्मा स्टीकर्स लावायला सांगितल्याची माहिती समाजमाध्यमांवर आली आहे. दरम्यान अद्रमुकने वेळेत मदत पोहोचवली नाही व प्रसिद्धी मिळवण्यासाठी अम्मा स्टीकर्सची सक्ती केली, असा द्रमुकचे प्रमुख करुणानिधी यांनी आरोप केला आहे.\