सध्याच्या करोना कालावधीमध्ये डॉक्टर्सच्या अनेक बातम्या समोर येत असतानाच दिल्लीतूनही एक नुकतीच एक बातमी समोर आली असून या बातमीमधून डॉक्टरांना देव का म्हणतात हे सिद्ध होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. झालं असं की दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एक रुग्णाची प्रकृती खूपच चिंताजनक होती. या रुग्णावर शस्त्रक्रीया करण्यासाठी तातडीने रक्ताची गरज होती. मात्र त्याला कोणी रक्तदाता मिळत नव्हता. अखेरच येथील एका निवासी डॉक्टरनेच आधी या व्यक्तीसाठी रक्तदान केलं आणि त्यानंतर या व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रीया झाली.

रुग्णाला रक्तदान करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे डॉक्टर मोहम्मद फवाज आणि त्याचे वय आहे अवघे २४ वर्ष. शस्त्रक्रीया विभागामध्ये काम करणाऱ्या फवाजने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एका तिशीत असणाऱ्या रुग्णाला दाखल करण्यात आलं. या रुग्णाच्या डाव्या पायाला खालील बाजूस जखम झाली होती. यामुळे झालेल्या जंतूसंसर्गामुळे पायाला बरीच दुखापत झाली होती. त्यामुळेच डॉक्टरांनी तातडीने या रुग्णावर शस्त्रक्रीया करण्याचे ठरवले.

नक्की वाचा >> वयाच्या १७ व्या वर्षी वाचवले होते शेकडो प्रवाशांचे प्राण; मृत्यूनंतरही ‘त्याने’ दिले ८ जणांना जीवनदान

“हा रुग्ण त्याच्या पत्नीबरोबर आला होता. मात्र त्याच्या शस्त्रक्रीयेसाठी रक्ताची गरज होती. त्याच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ती रक्तदान करु शकत नव्हती. त्या रुग्णावर शस्त्रक्रीया करणाऱ्यांमध्ये माझाही समावेश होता. त्या व्यक्तीला होणारा त्रास पाहून त्याच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यक्तीच्या नातेवाईकाने येऊन रक्ताची व्यवस्था करण्याची वाट पाहण्याइतका वेळ नव्हता. त्यामुळे मीच रक्तदान करण्याचा निर्णय घेतला,” असं फवाजने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. फवाजने दिलेल्या रक्ताचे ट्रान्सफ्युजन करुन ते वापरण्यात आलं. रुग्णाच्या रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्याला रक्ताची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं होतं.

एम्सधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये पुरेश्या प्रमाणामध्ये रक्ताचा साठा नसल्याने फवाजने घेतलेल्या निर्णयामुळे लवकर रक्त उपलब्ध होऊ शकलं. “हिमोग्लोबीन कमी असल्याने शस्त्रक्रीयेदरम्यान रक्तदाब नियंत्रणात रहावा म्हणून आधी रुग्णाला ब्लड ट्रान्सफ्युजनच्या मदतीने रक्त देण्यात आलं आणि व्हेंटीलेटरच्या मदतीने त्याला ऑक्सीजन पुरवण्यात आला. तीन ते चार वेळा ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात आलं,” असं फवाज सांगतो.

शस्त्रक्रीयेनंतर काही तासांनी रुग्णाच्या शरीरामधील रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण सामन्य झालं. त्यानंतरच या रुग्णावर शस्त्रक्रीया करण्यात आली. “सध्याच्या महामारीच्या कालावधीमध्ये लोकांना मदत मिळणं शक्य होत नाही. डॉक्टरांचा मुख्य हेतू हा रुग्णाचा जीव वाचवण्याचा असतो. रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम उपचार मिळाले पाहिजेत असं मला वाटतं,” असं फवाज सांगतो.