मुंबईहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान तांत्रिक कारण देत मंगळुरू विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारण स्पष्ट करण्यास नकार दिला असला तरी, ‘विसरभोळ्या’ इंजिनीअरच्या प्रतापामुळे विमान तातडीने उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विमानातील क्रू मेंबरमध्ये असलेले दोन इंजिनीअर विमानाच्या चाकांना लॉक-अनलॉक करण्याचे काम करणारी लॅण्डिंग गिअरची पिन काढण्यास विसरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

एअर इंडियाचे मुंबईहून कोचीला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत सोमवारी संध्याकाळी ७.५० वाजताच्या सुमारास मंगळुरू विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले. तांत्रिक बिघाडाबाबत माहिती देण्यास विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यावेळी नकार दिला. मात्र, क्रू मेंबरमधील दोघा इंजिनीअरनी लॅण्डिंग गिअरमधील पिन न काढल्याने विमान उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील इंजिनीअर लॅण्डिंग गिअरमधील पिन काढण्यास विसरले. त्यामुळे वैमानिकाला उड्डाणानंतर चाके चेंबरमध्ये परत घेता आली नाहीत. त्यामुळे विमान तातडीने उतरवावे लागले. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिफ्ट इंचार्ज आणि संबंधित इंजिनीअरना निलंबित केले आहे. इंजिनीअर इतर कामांमध्ये व्यग्र होते. त्यामुळे पिन काढण्यास विसरले. विमान उतरवण्यात आल्यानंतर तपासणी केली असता, लॅण्डिंग गिअरमध्ये पिन असल्याचे दिसून आले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विमानतळ अधिकाऱ्यांनी याबाबत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला माहिती दिली. त्यांनी चौकशी करून संबंधित इंजिनीअरना निलंबित केले आहे. दरम्यान, विमानाचे एमर्जन्सी लॅण्डिंग केले त्यावेळी विमानात ५८ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.