कोझिकोड येथील विमान दुर्घटनेनंतर ‘डीजीसीए’च्या माजी प्रमुखांची स्पष्टोक्ती

हैदराबाद : केरळमधील कोझिकोड येथील टेबलटॉप धावपट्टीवर शुक्रवारी झालेल्या विमान अपघातास अनेक घटक कारणीभूत असू शकतात, पण तातडीने या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याची गरज आहे, असे मत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) माजी प्रमुख  इ. के. भारतभूषण यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे ही धावपट्टी तयार करण्यात त्यांचाच पुढाकार होता.

शुक्रवारी रात्री दुबईहून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरत जाऊन दरीत कोसळून १८ जण ठार झाले. याबाबत त्यांनी सांगितले की, कोझिकोडमधील करीपूर विमानतळावरची धावपट्टी १९८८ मध्ये तयार करण्यात आली. त्यानंतर २०१२ मध्ये हवाई वाहतूक महासंचालनालयाचा प्रमुख असताना मी या विमानतळावरील सुरक्षा त्रुटींमुळे तेथून विमान उड्डाणे बंद करण्याचा इशारा दिला होता. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोझिकोडची धावपट्टी विस्तारण्याची सूचना अनेकदा केली होती. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. महासंचालक असताना मी त्यासाठी प्रयत्न केले. पण त्याला स्थानिक पातळीवर जमीन अधिग्रहणाबाबत विरोध झाला होता. निदान आता तरी सर्वाना या प्रकरणाचे गांभीर्य कळले असेल.  हा विमानतळ झाला तेव्हा मी जिल्हाधिकारी होतो. नंतर हवाई वाहतूक संचालनालयाचा महासंचालक असताना मी धावपट्टीच्या विस्तारासाठी प्रयत्न केले, कारण मंगळुरुची दुर्घटना डोळ्यासमोर होती पण लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

१९८८ मध्ये हा विमानतळ झाला, तेव्हा तुम्ही मल्लापूरमचे जिल्हाधिकारी होतात याकडे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आम्ही जमिनी ताब्यात घेतल्या. प्रक्रिया पूर्ण केली, पण मोठे विमान उतरवण्यासाठी ती जागा पुरेशी नव्हती.

अपघाताचे संभाव्य कारण

हवाई वाहतूक संचालनालयाचे महासंचालक असताना करीपूर विमानतळ बंद करण्याचा इशारा इ. के . भारतभूषण यांनी दिला होता. त्याबाबत त्यांनी सांगितले की, विमानतळांच्या निगा व दुरुस्तीवर दुमत असू शकत नाही. त्यामुळे एकदा मी करीपूर विमानतळावरून उड्डाणे बंद करण्याचा इशारा दिला होता. मी मूळ मलबारचा आहे, त्यामुळे हा विषय मला जवळचा आहे. त्या वेळी सर्वेक्षण करण्यास गेलेल्या चमूला लोकांनी मारहाण केली, होती पण आम्हाला अधिक जमीन हवी होती. त्या वेळी थोडी जास्त जमीन मिळाल्याने तडजोड झाली. धावपट्टीवर विमान आल्यानंतर त्याला सुरक्षा क्षेत्रापलीकडे थोडी जागा मिळेल एवढी स्थिती निर्माण झाली. कालचा अपघात हा विमानाचा वेग हा त्या क्षेत्राला भेदून जाण्याइतका असल्याने झाला. त्यामुळे धावपट्टीची भिंत तोडून ते दरीत कोसळले. काल कोसळले ते विमान लहान होते, पण धावपट्टीची काळजी घेणे आवश्यक होते. आता हवाई वाहतूक  महासंचालनालयाच्या चौकशीत वैमानिकांची मानसिक स्थिती, त्यांना पुरेशी झोप मिळाली होती की नाही, ते काही औषधे घेत होते का, याचा विचार केला जाईल. ही चौकशी व्यापक असते. धावपट्टीतील दोषही तपासले जातील. तूर्त अहवालाची वाट पाहणे  आपल्या हातात आहे.