28 September 2020

News Flash

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल ‘ईडी’समोर गैरहजर, दिले हे कारण

अटक करण्यात आलेल्या तलवारने एमिरेट्स आणि एअर अरेबियाच्या वतीने पटेल यांना संबोधित केलेल्या अनेक पत्रांना अंतिम रूप दिले, असाही दावा ईडीने आरोपपत्रात केला होता.

संग्रहित छायाचित्र

यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्यातील एअर इंडियाशी संबंधित प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून गुरुवारी प्रफुल्ल पटेल हे ‘ईडी’समोर अनुपस्थित राहणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज ‘ईडी’समोर उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे यासाठी पुढील तारीख द्यावी, असे पटेल यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

हवाई वाहतूक घोटाळ्यात एअर इंडियाला झालेल्या नुकसानाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले पटेल यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यापुढे हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

यानुसार आज (गुरुवारी) प्रफुल्ल पटेल ईडीसमोर हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी ईडीसमोर अनुपस्थित राहणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊ शकत नाही. त्यामुळे यासंदर्भात पुढील तारीख द्यावी, अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांच्यावतीने ‘ईडी’कडे करण्यात आली आहे.

प्रकरण नेमके काय?
हवाई वाहतूक क्षेत्रातील दलाल (लॉबिस्ट) दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. तलवारने त्याचे संपर्क वापरून खासगी विमान कंपन्यांसाठी अनेक फायदे लाटले. एमिरेट्स, एअर अरेबिया आणि एअर कतार यांच्यासाठी लॉबिंग करण्याकरिता व त्यांचा बेसुमार फायदा करून देण्यासाठी तलवारने राजकीय नेते, मंत्री व इतर सरकारी नोकर आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी यांच्याशी संधान साधले, असाही ईडीचा आरोप आहे. तलवारने २००८-०९ या काळात एअर इंडियाचे नुकसान करून या खासगी विमान कंपन्यांसाठी अनुकूल असे वाहतुकीचे हक्क मिळवून दिल्याचा ईडीचा दावा आहे. मोबदल्यात, या कंपन्यांनी तलवार याला २७२ कोटी रुपये दिले असेही नंतर उघड झाले. या आदारे ईडीने तलवारविरोधात आरोपपत्र दाखल केले. तलवार हा पटेल यांच्या नियमितपणे संपर्कात होता, असे त्यात म्हटले होते. अटक करण्यात आलेल्या तलवारने एमिरेट्स आणि एअर अरेबियाच्या वतीने पटेल यांना संबोधित केलेल्या अनेक पत्रांना अंतिम रूप दिले, असाही दावा ईडीने आरोपपत्रात केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 12:13 pm

Web Title: air india route sharing deal ncp leader praful patel seeks next date for hearing ed summons
Next Stories
1 ऑपरेशन ब्लूस्टारची ३५ वर्ष, सुवर्ण मंदिरात ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
2 शिवसेनेचा लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा, संख्याबळाच्या आधारे भाजपाकडे मागणी
3 त्यावेळी बेपत्ता AN-32 विमानातील वैमानिकाची पत्नीच होती नियंत्रण कक्षात
Just Now!
X