भारतीय वायूसेनेच्या मिराज विमानांनी मंगळवारी पहाटे पीओकेत घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय वायूसेनेच्या या अभिमानास्पद कामगिरीस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सलाम केला आहे. राहुल गांधी यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे.
Congress President Rahul Gandhi tweets, "I salute the pilots of the IAF" (file pic) pic.twitter.com/1mf0BUjDTD
— ANI (@ANI) February 26, 2019
तत्पूर्वी, भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते.
या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 10:05 am