ब्रिटनने सीरियातील आयसिसच्या तळांवर हवाई हल्ले केले तर त्यामुळे देशाला कसलाही धोका नसून, उलट ब्रिटन आणखी सुरक्षित होईल, असे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये बोलताना त्यांनी आपले मत मांडले. सीरियामध्ये हवाई हल्ले करण्यासाठी डेव्हिड कॅमेरून यांनी आखलेल्या योजनेबद्दल त्यांनी सभागृहाला माहिती दिली.
आपल्या प्रस्तावाला सभागृहातील सदस्यांनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करून ते म्हणाले, आयसिस ब्रिटनवर हल्ला करण्याची आधीपासूनच शक्यता आहे. त्यामुळे आपण आपल्या सुरक्षेवर भर दिलाच पाहिजे. या दहशतवाद्यांचे अड्डे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्यावर हल्ला केलाच पाहिजे. सीरिया आणि इराकमध्ये आयसिसला नेस्तनाबूत करण्यासाठी योजना आखली जाऊ शकते. हे सर्व पटकन होईल, अशी अपेक्षा ठेवू नका. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. पण आपण आपले लक्ष्य साध्य करू शकतो, असे त्यांनी आपल्या नियोजनाच्या आराखड्यात म्हटले आहे.
ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षामध्ये सीरिया आणि इराकमध्ये हवाई हल्ले करण्यावरून मतभेद आहेत. मजूर पक्षाचे नेते कॉर्बिन यांनी हवाई हल्ल्यांचे आम्ही कधीच समर्थन करू शकणार नाही, असे म्हटले आहे.