शीखांच्या धर्मग्रंथाचा कथित अपमानप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची बुधवारी एसआयटीकडून कसून चौकशी करण्यात आली. सुमारे २ तास चाललेल्या या चौकशीदरम्यान अक्षयला ४२ विविध प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत अक्षयने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, चौकशी पथकाने चंदीगडमध्ये अक्षयकुमारची सखोल चौकशी केली. यामध्ये राम राहिम आणि सुखबीर बादल यांच्यासोबत झालेल्या भेटी आणि गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथाच्या कथीत अपमानप्रकरणी अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले. दरम्यान, अक्षयने एसआयटीसमोर सर्व आरोप नाकारले आहेत.

कोटकपूरा पोलीस ठाण्यात दाखल खटल्यासंबंधी माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, शिरोमणी अकाली दलाचे सर्वोसर्वा सुखबीरसिंग बादल आणि अक्षयकुमारला समन्स पाठवले होते. याप्रकरणी अक्षयकुमारवर न्या. रणजीत सिंग आयोगाच्या अहवालात गंभीर आरोप लावण्यात आले होते. या आरोपांनुसार, अक्षयने २० सप्टेंबर २०१५ रोजी आपल्या फ्लॅटवर तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आणि बालात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम यांची भेट घडवून आणल्याचा आरोप आहे. या बैठकीतच राम रहिमचा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयकुमारने चौकशीदरम्यान आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर खोटे आरोप लावण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच विनाकारणच आपले नाव यामध्ये गोवण्यात आल्याचे सांगताना गुरुग्रंथ साहिबचा आपण कसलाही अपमान केलेला नाही असेही अक्षयने म्हटले आहे.