02 March 2021

News Flash

फेक न्यूज प्रकरण : चीनच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन कंपनीला भारतीय न्यायालयाची नोटीस

कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने दाखल केली याचिका

File Photo (Photo : AP)

चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांना भारतीय न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. भारतीय कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढून टाकल्या प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनीने कारवाई केलेल्या या कर्मचाऱ्याने कंपनीच्या अ‍ॅपवर सेन्सॉरशीप असणाऱ्या आणि खोट्या बातम्या असल्याचे निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतरच या कर्मचाऱ्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा कागदपत्रांच्या आधारे केला असल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

भारताने अलिबाबा समूहाच्या यूसी न्यूज, यूसी ब्राउझर आणि इतर ५७ चीनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. भारत आणि चीनदरम्यान लडाखमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामुळे चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. भारत सरकारने बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपच्या सर्व कंपन्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवले आहे. यामध्ये कंपनी काही माहिती सेन्सॉर करते का किंवा इतर देशाच्या सरकारसाठी काम करते का अशा प्रश्नांसंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. या बंदीचा चीनने निषेध केला आहे.

नक्की पाहा >> भारतातील अव्वल बँकांच्या CEOs च्या पगाराचे आकडे पाहून थक्क व्हाल

न्यायालयामध्ये २० जुलै रोजी अलिबाबा ग्रुपच्या यूसी वेब कंपनीमध्ये काम करणाऱ्या पुष्पेंद्र सिंग परमार यांनी चीनच्या विरोधातील माहिती कंपनीच्या अ‍ॅपवर सेन्सॉर करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे. तसेच यूसी ब्राउझर आणि यूसी न्यूज या अ‍ॅपवर सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होणाऱ्या खोट्या बातम्या दाखवल्या जात असल्याचे परमार यांनी म्हटलं आहे. गुरुग्रामच्या दिवाणी जिल्हा न्यायालयामध्ये हा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अलिबाबा, जॅक मा यांच्याबरोबर कंपनीशी संबंधित एक डझनभर लोकांना आणि कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांना न्यायलयाने नोटीस पाठवली आहे. सर्वांनी प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातू २९ जुलैच्या सुनावणीरोजी न्यायलयासमोर हजर रहावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. तसेच कंपनी आणि या प्रकरणाशी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ३० दिवसांमध्ये न्यायालयासमोर लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

यूसी इंडियाने याप्रकरणासंदर्भात बोलताना, “भारतीय बाजारपेठ आणि तेथील स्थानिक कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी कंपनी वचनबद्ध आहे. कंपनीची धोरणे स्थानिक कायद्यांचे पालन करतात. आम्ही चालू असलेल्या खटल्यांबाबत भाष्य करु इच्छित नाही” असं म्हटलं आहे. अलिबाबा कंपनीच्या प्रतिनिधिंनीही यासंदर्भात कंपनी किंवा जॅक मा यांच्याबाजूने कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे.

यूसी वेबमध्ये सहाय्यक निर्देशक म्हणून परमार ऑक्टोबर २०१७ पर्यंत काम करत होते. त्यांनी आता कंपनीकडून २ लाख ६८ हजार डॉलर्सच्या भरपाईची मागणी केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीन सरकार तेथील कंपन्यांना परदेशामध्ये व्यवसाय करताना आंतरराष्ट्रीय काद्यांचे आणि नियमांचे पालन करण्याचा सल्ला देते असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 2:38 pm

Web Title: alibaba jack ma summoned by indian court over ex employee lawsuit scsg 91
Next Stories
1 मैत्रीच्या आडून चीन रशियाबरोबर सुद्धा करत होता दगाबाजी
2 “बकरी ईदला कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या”, भाजपा आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
3 करोनावरील उपचारासंबधी दोन आठवड्यात ‘गुड न्यूज’, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
Just Now!
X