दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे इराकच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या भारतीयांची तेथून सुखरूप सुटका करण्यासाठी केंद्र सरकार सर्व पर्यायांचा विचार करते आहे. इराकच्या हिंसाचारग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांना तेथून बाहेर काढण्यासाठी तेथील स्थानिक प्रशासनाचीही मदत घेतली जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी सांगितले.
इराकमधील भारतीयांना मोठ्या संख्येने तेथून हलविण्यात येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी राजनाथसिंह यांना विचारला. त्याला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, इराकमधील प्रत्येक भारतीयाची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. हिंसाचारग्रस्त भागातून १७ जणांची सुटका करण्यात आली. आतापर्यंत एकूण ३४ भारतीयांना सुखरूपपणे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तेथील भारतीयांना स्वतःहून तातडीने परत यावे, अशाही सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.