भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रविवारी संध्याकाळपासून याच्या काऊंटडाऊनला सुरुवात होणार आहे, त्यानंतर नव्या वेळेप्रमाणे, सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.

इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन यांनी सांगितले की, १५ जुलै रोजी चांद्रयान-२च्या प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. गेल्या शनिवारी इस्रोने चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठीचे यान जीएसएलव्ही मार्क ३ एम१ ची तालीमही पूर्ण केली आहे. यावेळी त्याच्या कामगिरीत कुठलीच अडचण आढळून आली नाही. त्यामुळे आता सोमवारी दुपारी २.४३ वाजता चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.

यापूर्वी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तारीख १५ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आयत्या वेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते, असा निर्णय घेणेही महत्वाचे होते. या मोहिमेत काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितले की, मोठी दुर्घटना होण्याऐवजी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले यासाठी इस्रोचे कौतुक करायला हवे.