अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सुधीर अग्रवाल यांनी नुकताच एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १ लाख खटल्यांची सुनावणी करण्याची कामगिरी केली आहे. ५ ऑक्टोबर २००५ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून न्यायाधीश सुधीर अग्रवाल यांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक खटल्याचे कामकाज जलदगतीने पूर्ण होईल, असा कटाक्ष बाळगला. त्यामुळेच त्यांनी गुरुवारी एक लाख खटल्यांचे कामकाज पाहण्याच्या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. यापैकी १० हजार खटल्यांचे निकाल त्यांनी लखनऊ उच्च न्यायालयात असताना दिले होते. रामजन्म भूमी-बाबर मशिद आणि ब्रद्रिकाश्रम ज्योतीपीठातील शंकराचार्यांसंदर्भातील खटल्यात दिलेले निकाल त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पे ठरले.
याशिवाय, सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे ते प्रकाशझोतात आले होते. ५ ऑक्टोबर २००५ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर १० ऑगस्ट २००७ रोजी सुधीर अग्रवाल यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. सुधीर अग्रवाल हे एप्रिल २०२० मध्ये न्यायाधीश पदावरून निवृत्त होतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2018 11:04 am