सक्तवसुली संचालनालयाची कारवाई

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता शाबीर शाह याच्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या बेहिशेबी पैशाच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने महंमद अस्लम वाणी या हवाला डिलरला अटक केली आहे. काश्मीरमध्ये दहशतवादाला होत असलेल्या अर्थपुरवठय़ाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सध्या एनआयएने मोहीम हाती घेतली असतानाच या कारवाईला महत्त्व आहे.

सक्तवसुली संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की वाणी याला जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगर येथून अटक करण्यात आली. त्यात राज्य पोलिसांनी मदत केली. वाणी (वय ३६) याला श्रीनगरहून येथे आणून दिल्लीच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्याला कोठडी देण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्याला अनेक समन्स पाठवूनही तो हजर झाला नाही. आता त्याला अटक केली असून शाह व इतर आरोपींसमक्ष त्याचे जाबजबाब होणार आहेत. शाह सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असून त्याला २६ जुलैला श्रीनगर येथून अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २००५ मधील एका प्रकरणात वाणी याचा संबंध असून त्याने २.२५ कोटी रुपये त्या वेळी शाह याला दिले होते. २०१० मध्ये दिल्ली न्यायालयाने वाणी याला दहशतवादी अर्थपुरवठय़ाच्या आरोपातून मुक्त केले होते पण शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरवले होते. शाह व वाणी यांच्या विरोधात पीएमएलए कायद्याखाली सक्तवसुली संचालनालयाने गुन्हेगारी फिर्याद दाखल केली होती. वाणी याला हवाला मार्गाने मध्यपूर्वेतून ६३ लाख रुपये स्वीकारल्याच्या आरोपाखाली २००५ मध्ये अटक करण्यात आली होती. जबाबात त्याने पोलिसांना सांगितले, की ५० लाख रुपये शाह याला दिले होते तर १० लाख रुपये जैश-ए-महंमदचा कमांडर अबू बकर याला दिले होते. बाकीचे पैसे कमिशन म्हणून स्वत: घेतले होते. वाणी हा श्रीनगरचा असून त्याने शाह व संबंधितांना २.२५ कोटी रुपये दिले होते.