वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कामासाठी परदेशामध्ये जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी शनिवारी दिल्ली न्यायालयाकडे केली आहे.

रॉबर्ट वढेरा यांनी लंडनमधील १२, ब्रायनस्टन स्क्वेअर येथे १.९ दशलक्ष पौंडाची मालमत्ता खरेदी केली असून त्यासाठी मनीलॉण्डरिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रॉबर्ट वढेरा यांना ९ डिसेंबरपासून दोन आठवडय़ांसाठी स्पेनला जावयाचे आहे, असे वढेरा यांचे वकील केटीएस तुलसी यांनी विशेष न्यायाधीश अरविंदकुमार यांना सांगितले. याबाबत न्या. अरविंदकुमार यांनी सक्तवसुली संचालनालयास (ईडी) ९ डिसेंबपर्यंत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्याच दिवशी याबाबतची सुनावणी होणार आहे.

जून महिन्यात न्यायालयाने वढेरा यांना अमेरिका आणि नेदरलॅण्ड्स येथे वैद्यकीय उपचारांसाठी जाण्यासाठी सहा आठवडय़ांची मुदत दिली होती. मात्र वढेरा यांना ब्रिटनला जाण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीविना देशाबाहेर जाण्यास वढेरा यांना मज्जाव करण्यात आला आहे.