व्यावसायातील धोके आणि कर्जबारीपणामुळे तणावग्रस्त होऊन आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. त्यानुसार, सन २०१८ मध्ये देशातील सुमारे ८००० व्यावसायिकांनी आपले जीवन संपवले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार, सन २०१८ मध्ये एकूण ७,९९० व्यावसायिकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी २.७ टक्के व्यावसायिक म्हणजेच ७,७७८ जणांनी गेल्या वर्षी आपले जीवन संपवले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ज्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांची ही आकडेवारी आहे.

व्यावसायिकांनी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण कर्नाटकात असून (१,११३) त्यानंतर महाराष्ट्र (९६९) आणि तामिळनाडू (९३१) या राज्यांचा क्रमांक लागतो. देशात या तीन्ही राज्यांचा जीडीपी देखील सर्वाधिक आहे, असे असतानाही या राज्यांतील व्यवासायिकांमध्ये आत्महत्यांचे सर्वाधिक आढळून आले प्रमाण आहे.

यामागे अनेक कारणे सांगतिली जात आहेत. दिवसभर काबाडकष्ट करुन देखील तुमच्या हातात काहीच पडत नसेल (यामध्ये ना पैसा ना समाधान) तर ही गोष्ट कोणाला सांगता येत नाही. आपल्याला कोणी याबाबत मदतही करु शकणार नाही अशी भावना मनात तयार होत असल्याने तणावग्रस्त होऊन लोक स्वतःचे जीवन संपवतात, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, देशात सन २०१८ मध्ये ४,९७० पेक्षा अधिक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय अथवा कंपनी कर्जबाजारी झाल्याने अथवा दिवाळखोरीत निघाल्याने आलेल्या तणावातून आत्महत्या केल्या आहेत. कर्जबारीपण हे अशा व्यावसायिकांना उघडपणे कोणाला सांगता येत नाही, उलट कायम तणावाखाली राहिल्याने त्यांच्या कुटुंबात वाद सुरु होतात.

दरम्यान, यानंतर कौटुंबिक वाद हे सर्वात मोठे कारण आत्महत्यांसाठी ठरत आहे. अशा कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण २०१७ मध्ये ३०.१ टक्के होते तर २०१८मध्ये हे प्रमाण ३०.४ टक्के होते. त्यानंतर आजारपण या कारणामुळे सन २०१८ मध्ये १७.७ टक्के व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर लग्नासंबंधी बाबींमुळे ६.२ टक्के तर ड्रग्जच्या व्यसनधिनतेमुळे ५.३ टक्के आणि ४ टक्के आत्महत्या या प्रेम प्रकरणातील बाबींमुळे झाल्याचे या नोंदणीतून समोर आले आहे.