राजस्थान सरकारने अवैधरित्या गायींची तस्करी केल्याप्रकरणी पेहलू खान आणि त्याच्या दोन मुलांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 1 एप्रिल 2017 रोजी काही तथाकथित गोरक्षकांनी पेहलू खानला मारहाण केली होती. त्यानंतर 3 दिवसांना पेहलू खानचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला होता.

तसेच पेहलू खानच्या हत्येप्रकरणी 8 जणांवर एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवनागीशिवाय गायींची वाहतूक केल्याप्रकरणी पेहलू खान आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता दुसऱ्या प्रकरणात पेहलू खान आणि त्याच्या मुलांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पेहलू खानचा मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधात खटला उभा राहणार नाही. परंतु त्याच्या दोन मुलांविरोधात खटला सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपपत्रात खान आणि त्याच्या दोन मुलांविरोधात राजस्थान बोवाइन अ‌ॅनिमल अॅक्ट 1995 आणि रूल्स 1995 च्या 5, 8 आणि 9 अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात आपल्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपल्यावरच गायींच्या तस्करीचे आरोप लावण्यात आले. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हे आरोप मागे घेतले जातील अशी अपेक्षा होती. परंतु आमच्याचविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले, अशी प्रतिक्रिया पहलू खानचा मोठा मुलगा इरशाद याने माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, गाडीचे मालक जगदीश प्रसादविरोधातही संबंधित कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा तपास भाजपा सरकारच्या कार्यकाळात झाला होता आणि आरोपपत्र सादर करण्यात आले. तपासात कोणत्याही प्रकारची चुक आढळल्यास या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात येईल, अशी माहिती, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली.