लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. अमरनाथ यात्रेवेळी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असल्याचे जम्मू-काश्मीर सरकारच्या गृह विभागाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे. राज्यातील पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दले यांना कोणतीही घातपाताची कारवाई टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
अमरनाथ यात्रेचा भौगोलिक परिसर, हजारो भाविकांची उपस्थिती, यात्रेवर यापूर्वी झालेले हल्ले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी यात्रेकरूंना लक्ष्य करण्याचे प्रकार हे सगळे लक्षात घेऊन यंदाच्या यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
येत्या २८ पासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होते आहे. कोणत्याही भाविकाच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून येणारे संदेश हे सुरक्षा यंत्रणांना तातडीने दिले जातील, जेणे करून त्यांना अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेता येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 4:31 am