29 January 2020

News Flash

Amazon Fire: पृथ्वीचं फुफ्फुस जळतंय! जगातील सर्वात घनदाट जंगलाला भीषण आग

धुराच्या ढगांमुळे भर दुपारीही अनेक शहरांमध्ये होतोय अंधार

अॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा

जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा पसरला आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून त्याने रौद्ररुप धारण केलं आहे. मागील पंधरादिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाले आहेत. या आगीमुळे अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोवर धुराचे ढग जमा झाल्याने भरदिवसा अंधार झाला आहे. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील २ हजार ७०० किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे.

जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलांना लागलेली आग इतकी भीषण आहे की वणव्यामधून निघणारा धूर अंतराळातूनही दिसत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार वायव्येतील या जंगलांमध्ये लागल्याने आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यांपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलमधील रिओ दी जनेइरोपर्यंत धूर पसरला आहे. अनेक शहरांमध्ये भरदिवसा अंधार दाटून आल्यासारखे वातवारण झाले होते. ब्राझीलबरोबरच पेरु, बोलिविया आणि पेरुग्वे या देशांमध्येही या वणव्याचा धूर पसरत आहे.

ब्राझीलमधील अंतराळ संशोधन संस्था आयएनपीईने अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींसंदर्भातील माहिती २०१३ पासून गोळा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मागील सहा वर्षांमध्ये या जगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. आयएनपीईच्या आकडेनुसार ब्राझीलमध्ये वर्षभरात ७२ हजारहून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक घटना ब्राझीलच्या हद्दीत असणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगली प्रदेशात घडल्या आहेत. या वर्षी अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलांमध्ये वर्षातील १२ महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमीनीपर्यंत पोहचत नाहीत. जगभरातील वनस्पतींपासून तयार होणाऱ्या एकूण ऑक्सिनपैकी २० टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून निर्माण होतो. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता या जंगलांच्या अस्तित्वालाच या भीषण वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. जंगलामधील अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याचे अनेक हृदद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दोष कुणाचा?

अॅमेझॉन पर्जन्यवनांच्या सौंरक्षणाचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी उपस्थित केला आहे. जंगलाला मुद्दाम लावल्या जाणाऱ्या आगी, बेकायदा वृक्षतोड यासारख्या समस्यांसंदर्भात सरकारी यंत्रणांकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र ब्राझील सरकारने या तक्रारींकडे दूर्लक्ष करत वनतोडीसाठी परवानग्या दिल्या. त्यामुळे बेछूट वृक्षतोड झाल्याने या वनांचा मोठा भाग मागील काही वर्षांमध्ये नष्ट झाला आहे. अनेकदा या वनांच्या सीमेवर राहणाऱ्या गावातील गावकरी वन जमीनीवर शेती करण्यासाठी वनांना आगी लावतात. यासंदर्भातही वन्यप्रेमींनी आक्षेप घेतला होता. मात्र त्याकडेही दूर्लक्ष करण्यात आले. आता अॅमेझॉनच्या वणव्याने भीषण रुप धारण केल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि ब्राझील सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. केवळ पर्यावरण प्रेमीच नाही तर जगातील सर्वात संवेदनशील अशा नैसर्गिक प्रदेशाकडे दूर्लक्ष करणाऱ्या ब्राझील सरकारवर युरोपसहीत इतर अनेक देशांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

First Published on August 23, 2019 1:59 pm

Web Title: amazon wildfires brazil rainforest burning at a record rate scsg 91
Next Stories
1 पाकिस्तानला झटका; टेरर फंडिंग प्रकरणी FATF ने टाकले काळ्या यादीत
2 राजीव गांधींनाही पूर्ण बहुमत, मात्र सत्तेचा वापर भीती पसरवण्यासाठी नाही- सोनिया गांधी
3 दरवाजा उघडा ठेवून २८० किमी ताशी वेगाने धावली बुलेट ट्रेन, ३४० प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन केला प्रवास
Just Now!
X