30 October 2020

News Flash

‘भीमराव रामजी आंबेडकरां’चा मतलबी वापर

योगी सरकारला हे पूर्ण नाव लिहून बाबासाहेबांच्या वडिलांचा गौरव करायचा आहे की मतांचे राजकारण (पर्यायाने गैरवापर) हाच हेतू आहे?

– बी. व्ही. जोंधळे, औरंगाबाद

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर नको’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असल्याची बातमी (लोकसत्ता, ५ एप्रिल) आली. त्याआधी उत्तर प्रदेशातील योगी सरकारने यापुढे डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव ‘भीमराव रामजी आंबेडकर’ असे लिहिले जावे, असा एक अध्यादेश काढला आहे. मुद्दा असा की, योगी सरकारला हे पूर्ण नाव लिहून बाबासाहेबांच्या वडिलांचा गौरव करायचा आहे की मतांचे राजकारण (पर्यायाने गैरवापर) हाच हेतू आहे? लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भाजपप्रणीत रालोआला विविध प्रादेशिक पक्षांनी घरघर लावली आहे. तेव्हा आजवर दुर्लक्षित ठेवलेल्या समाजगटांचा पाठिंबा मिळवणे भाजपला भाग आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशात बसप आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यामुळे दोन पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला. अशा स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव – वडिलांच्या ‘रामजी’ या नावासह – लिहिण्याचा अट्टहास काय कमावणार आणि काय गमावणार आहे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख त्यांचे अनुयायी कधीही ‘भीमराव’ असा करीत नाहीत. आबालवृद्ध त्यांना बाबासाहेब म्हणतात; युगपुरुष, महामानव म्हणून पितृस्थानी मानतात. असे असताना उत्तर प्रदेश सरकारने ‘भीमराव रामजी’ असा बदल करून ‘बाबासाहेब’ हे नाव मिटवण्याचा छुपा प्रयत्न चालविणे हे खटकणारेच आहे. बरे, भीमराव रामजी आंबेडकर असे नाव लिहिल्यामुळे बाबासाहेबांच्या वडिलांचा सन्मान होतो/वाढतो असे जर खरोखरच भाजपला वाटत असेल, तर मग देशभरच्या २१-२२ राज्यांतील भाजपची वा भाजप सहभागी असलेली सरकारे, सर्वच राष्ट्रपुरुषांची नावे पूर्णत: लिहिली जावीत, असे अध्यादेश काढणार आहेत काय?

‘रामजी’ हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव होते, पण म्हणून हिंदू धर्मव्यवस्थेने त्यांना समतेची वागणूक दिली होती काय? ‘रामजी’पुत्र डॉ. आंबेडकर यांना हिंदू धर्ममरतडांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश का नाकारला होता? रामजी या नावाचे राजकीय भांडवल करणारे उत्तर प्रदेश सरकार, बाबासाहेब रामास देव मानत नव्हते, हे सांगणार आहे काय? बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘राम आणि कृष्णाचे कोडे’ (रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण) चा परिचय उत्तर प्रदेशचे सरकार तेथील जनतेला करून देणार आहे काय? नाही. असे काहीही होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 8:25 am

Web Title: ambedkar has been used for selfish reasons
Next Stories
1 धन्य ती माता अन् धन्य तो भीम
2 अर्थशास्त्री आंबेडकर !
3 आंबेडकरांच्या अर्थविषयक ग्रंथाचा मराठी अनुवाद शासनदरबारी धूळ खात
Just Now!
X