वॉशिंग्टन : चीनमध्ये पसरलेल्या घातक करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस तयार करीत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांना चीनने सहकार्य करावे अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेने दोन चमू तयार केले असून ते या विषाणूची माहिती घेत आहेत.

या विषाणूने चीनमध्ये १३२ बळी घेतले असून अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ या संस्थेने या विषाणू प्रतिबंधासाठी लस तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. लस तयार करून पहिली चाचणी घेण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले आहे. एनआयएच या संस्थेचे अधिकारी अँथनी फॉसी यांनी म्हटले आहे की, चीनमधील परिस्थिती भयानक असून तेथे तातडीने लस उपलब्ध होण्याची गरज आहे. २००२-२००३ मध्ये चीन व हाँगकाँगमध्ये सार्स म्हणजे सीव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोमची साथ होती त्याच वेळी अमेरिकेने लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते पण ती नंतर तयारच झाली नाही. चीनने या नवीन विषाणूचा जनुकीय आराखडा तयार करण्यास मदत करावी. आमच्या पथकांना तेथे येऊ द्यावे असे अमेरिकेचे आरोग्य मंत्री अ‍ॅलेक्झ अझार यांनी म्हटले आहे.