जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेज अनेक सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जर शाळा सुरू केल्या नाही तर शाळांना देण्यात येणारा निधी रोखण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आखून दिलेली मार्गदर्शक सूचना अधिक कठोर असल्याची तक्रारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांच्या या तक्रारीनंतर काही वेळातच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली. तसंच करोनाच्या नियंत्रणासाठी आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील आठवड्यात नवी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याचंही माईक पेंस यांनी सांगितलं.
“पुढील आठवड्यात नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. नव्या मार्गदर्शक सूचना आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवतील. मार्गदर्शक सूचना अधिक कठोर नसाव्यात अशी आमची इच्छा नसल्याचंही राष्ट्राध्यक्ष म्हणाले,” असं पेंस यांनी नमूद केलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांमी स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांवरही दबाव वाढवला आहे. परंतु अशा परिस्थितीतही न्यूयॉर्क शहर प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत ते आठवड्यात केवळ दोन किंवा तीनच दिवस शाळेत जातील आणि बाकीच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षण घेतील, असं स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेत सध्या ३१ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर न्यूयॉर्कसारख्या शहरातच ४ लाख करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 9:41 am