अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस अजूनही कायम आहे. व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. अजूनही काही राज्यांचे निकाल आलेले नाहीत. फ्लोरिडा, टेक्सास ही मोठी राज्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकल्यानंतर बायडेन यांनी एरिझोनामध्ये उलटफेर केला.

एरिझोनामध्ये बायडेन यांनी विजय मिळवला आहे. या राज्यात ११ इलेक्टोरल मते आहेत. दोन मोठी राज्ये ट्रम्प यांच्याकडे गेल्यानंतर बायडन यांच्यासाठी एरिझोनाचा विजय आवश्यक होता. २०१६ मध्ये एरिझोनातून ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. पेन्सिलवेनिया, विसकॉनसिन या दोन महत्त्वाच्या राज्यांसह अजून सात राज्यांचा निकाल आलेला नाही.

डेलावर, या आपल्या गृहराज्यासह बायडेन यांनी एकूण २० राज्यात विजय मिळवला आहे. कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन या महत्त्वाच्या राज्यात त्यांनी विजय मिळवलाय. बायडेन यांच्याकडे २३८ तर ट्रम्प यांच्याकडे २१३ इलेक्टोरल मते आहेत. बहुमतांचा आकडा २७० आहे. मंगळवारी १० कोटी पेक्षा जास्त मतदारांनी अमेरिकेत मतदानाचा हक्क बजावला.