भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अमेरिकेतील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेने भारताला दोनशेहून अधिक प्राचीन वस्तू आणि मुर्ती परत केल्या. त्यांची किंमत जवळजवळ दहा कोटी डॉलर्स इतकी आहे. काही जण या मूर्त्यांची किंमत पैशात करू शकतात, परंतु, आमच्यासाठी त्या अनमोल आहेत. आमची संस्कृती आणि परंपरेचा त्या भाग असल्याचे ब्लेअर हाऊसमधील कार्यक्रमात मोदी म्हणाले.
अमेरिकेने भारतास परत केलेल्या या वस्तूंमध्ये देवदेवतांच्या मूर्ती तसेच कांस आणि टेराकोटच्या कलाकृतींचा समावेश आहे. यातील अनेक कलाकृती या दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. भारतातील अतिशय संपन्न अशा धार्मिकस्थळांमधून यांची लूट करण्यात आली होती. यातील एक मूर्ती संत मणिक्कवाचकर यांची असून ती अतिशय पूरातन आहे. या मूर्तीला चेन्नईच्या सिवान मंदिरातून लूटण्यात आले होते. मुर्तीची सध्याची किंमत १५ लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. याशिवाय गणपतीचीदेखील एक मूर्ती यात असून, ती एक हजार वर्षे जुनी आहे.