नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या फेरबदलात उत्तर प्रदेशचे एक मोठे नेते कलराज मिश्र यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कलराज मिश्र मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळत होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे कॅबिनेटमधून राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची संख्या ६ झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांनी मला बोलावले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यास सांगितले. मोदींना भेटल्यानंतर राजीनामा टाइप केला आणि त्यांच्याकडे सोपवला, अशी प्रतिक्रिया मिश्र यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

७६ वर्षीय मिश्र उत्तर प्रदेशच्या देवरिया मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते राज्यातील ब्राह्मण समाजातील मोठे नेते आहेत. वाढत्या वयामुळे आपल्याला सक्रीय राहता येत नसल्यामुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.

कॅबिनेटच्या प्रस्तावित फेरबदलापूर्वी आतापर्यंत राजीवप्रताप रूडी, फग्गनसिंह कुलस्ते, संजीवकुमार बालियान, महेंद्रनाथ पांडे, बंडारू दत्तात्रेय आणि कलराज मिश्र यांनी राजीनामा दिलेला आहे. जलसंधारण मंत्री उमा भारती यांनीही राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा आज कॅबिनेटमध्ये सामील होणाऱ्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. शहा आज मथुरेतून दिल्लीत आले आहेत. वर्ष २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हा शेवटचा विस्तार असल्याचे मानले जाते.