पाकिस्तानला जगात एकटे पाडल्याचा दावा

बाओरा (मध्य प्रदेश) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने जैश-ए-महंमदचा प्रमुख मसुद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित केल्याचे श्रेय भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदी यांनी दहशवादाच्या प्रश्नावर पाकिस्तानला जगात एकटे पाडले, असा दावा शहा यांनी गुरुवारी केला.

मध्य प्रदेशातील राजगड लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ज्यावेळी वातारण तापते, त्यावेळी राहुल पसार होतात. त्यांच्या आईलाही त्यांचा ठावठिकाणा माहीत नसतो, अशी टीका शहा यांनी केली.

यावेळी शहा म्हणाले की, मसूद अझरने गेल्या अनेक वर्षांत अनेक बॉम्बस्फोट घडविले आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात कुणालाही यश आले नव्हते. पण कालच तो सोन्याचा दिन उजाडला आणि त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या धोरणाद्वारे पाकिस्तानला जगात एकटे पाडले आहे. आता संपूर्ण जग हे भारतासोबत उभे आहे.

सर्व देशांचा आपल्याला स्वसंरक्षणाच्या मुद्दय़ावर पाठिंबा मिळत आहे, असे शहा यांनी सांगितले. पाकिस्तानच्या भूमीत दहशतवादाची वाढ झाली, याची जगाला खात्री पटली आहे. पंतप्रधान मोदी यांनी हे जगाला सिद्ध करून दाखवले, असेही ते म्हणाले.

बालाकोट हल्ल्याने काँग्रेसला शोक

देशद्रोहाचा आरोप ठेवण्याची तरदूत असलेला कायदा रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. त्याचा उल्लेख करून अमित शहा म्हणाले की, देशाचे तुकडे पाडण्याची भाषा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारताने हवाई कारवाई केली. त्यावेळी  पाकिस्तानबरोबरच राहुल गांधी यांच्या काँग्रेसमध्ये शोक पसरला होता, असा आरोप शहा यांनी केला.

भारताचा राजनैतिक विजय – जेटली

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित केले हा भारताचा राजनैतिक विजय आहे, असे भाजपने म्हटले आहे. मात्र भारताचा हा विजय साजरा करण्यास विरोधी पक्ष कचरत आहे, कारण याची राजकीय किंमत मोजावी लागण्याची भीती त्यांना वाटत आहे, असेही भाजपने म्हटले आहे.

भारत गेल्या १० वर्षांपासून करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये भाजपला यश मिळाले, मात्र त्यामध्ये मोठे काही नाही, ही क्षुल्लक बाब असल्याचे आता विरोधक म्हणत आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षा याबाबत एकवाक्यता असण्याची देशाची परंपरा आहे, मात्र गेल्या काही वर्षांत ही परंपरा मोडली आहे. अझरला जागतिक दहशतवादी घोषित करणे हा भारताचा मोठा राजनैतिक विजय आहे, भारत जिंकला तर भारतीयजिंकतात, परंतु विरोधकांना याची राजकीय किंमत मोजावी लागण्याची भीती वाटत असल्याने ते हा विजय साजरा करण्यास कचरत आहेत, असे जेटली यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला हजर असलेल्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या राजनैतिक विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.