भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते भाजपाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. मात्र अमित शाह यांनी झेंडा फडकवण्यासाठी जेव्हा दोरी हाती घेतली तेव्हा आपला राष्ट्रध्वज खाली घरंगळत आला. आता हा तिरंगा खालीच पडतो की काय? असे वाटत होते मात्र तेवढ्यात अमित शाह यांनी दुसरी दोरी खेचली आणि झेंडा पुन्हा वर नेला व फडकवला. हा क्षण पाहून उपस्थितांनाही काही क्षण वाईट वाटले, मात्र वेळीच राष्ट्रध्वज फडकल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

अमित शाह यांच्या हातून झेंडा निसटल्याचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केल्यावर काँग्रेसने या व्हिडिओचे उदाहरण देत भाजपावर निशाणा साधला आहे. ज्या लोकांना देशाचा झेंडा सांभाळता येत नाही, ते देश काय सांभाळणार? असा प्रश्न विचारत एक ट्विट काँग्रेसने केले आहे

यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून भाजपावर टीका केली आहे. तिरंग्याने अमित शाह यांच्या हातून फडकणे पसंत केले नाही असेच हे संकेत आहेत. या तिरंग्याच्या माध्यमातून भारतमाता हे सांगते आहे की ती दुःखी आहे असे ट्विट करून केजरीवाल यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.