भाजपाध्यक्ष अमित शहा दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभा २०१९ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच अमित शहा यांनी सोशल मीडिया स्वयंसेवक संमेलनात सहभाग नोंदवत लोकांशी संवाद साधला. ४ जुलै रोजी अमित शहा वाराणसीत असताना असं काही घडलं, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. बनारस पोलीस लाईन येथील हेलिपॅडवर उतरल्यानंतर अमित शहा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत लालपूर येथील ट्रेड फॅसिलिटी सेंटरमध्ये पोहोचले होते. यावेळी कारसमोर आलेला कचऱ्याचा ढीग बघून त्यांचा चांगलाच पारा चढला.
कार सेंटरला पोहोचताच कारमधून उतरल्यावर अमित शहा यांनी कचऱ्याचा ढीग पाहून कार्यकर्त्यांना सुनावण्यास सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या बेजबादार वागण्याने अमित शहा संताप व्यक्त करत सेंटरच्या आत निघून गेले. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
अमित शहा यांनी सुनावल्यानंतर कार्यकर्त्यांनी कचरा उचलून फक्त बाजूला ठेवून दिला. कचर लांब कुठे नाही तर मैदानातच ठेवून दिला होता. यानंतर कार्यकर्त्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे आता कचरा नेमका उचलणार कोण असा प्रश्न निर्माण झाला. अखेर योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात एनएसजी कमांडोने पुढे होऊन कचरा बाजूला केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भाजपा कार्यकर्त्यांवर सडकून टीका करत आहेत.