अवघ्या आठवडाभरापूर्वी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या अमित शहा यांनी शनिवारी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यात युवा चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देण्यात आली असून वरुण गांधी यांना वगळण्यात आले आहे. ११ उपाध्यक्ष व आठ सरचिटणीसांसह एकूण ४३ जणांच्या या नव्या ‘शहा’बाजांमध्ये महाराष्ट्रातून विनय सहस्रबुद्धे यांना उपाध्यक्षपद तर खा. पूनम व श्याम जाजू यांना सचिवपद देण्यात आले आहे. औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांना महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारिणीत गडकरी गटाला डावलले
अमित शहांच्या नव्या संघात कर्नाटकातील खाण भ्रष्टाचाराचा आरोप असलेले माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले असून रा. स्व. संघातून भाजपमध्ये दाखल झालेल्या राम माधव यांना सरचिटणीसपदी नेमण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या पुरुषोत्तम रूपाला यांना उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. ११ उपाध्यक्षांमध्ये किरण माहेश्वरी व रेणू देवी या दोन महिलांचा समावेश आहे. आठ सचिवांमध्ये जगत प्रकाश नड्डा, राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, राम माधव, सरोज पांडे, भूपेंद्र यादव, राम शंकर कठेरिया यांच्यासह  रामलाल यांचा समावेश आहे. व्ही. सतीश, श्यादोन सिंह व बी. एल. संतोष यांना संघटन सचिव बनवण्यात आले आहे. बंडारू दत्तात्रय, सत्यपाल मलिक, मुख्तार अब्बास नक्वी, प्रभात झा, दिनेश शर्मा, रघुवर दास यांना उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.
*प्रवक्ते : शाहनवाज हुसेन, सुधांशू त्रिवेदी, मीनाक्षी लेखी, एम. जे. अकबर, विजय सोनकर शास्त्री, ललिताकुमार मंगलम, नलिन कोहली, सम्बित पात्रा, अनिल बलूनी, जीव्हीएल नरसिंह राव
*युवा मोर्चा अध्यक्ष : अनुराग ठाकूर
*अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष : फग्गनसिंह कुलस्ते
*अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष : अब्दुल रशीद अन्सारी
*अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : दुष्यंतकुमार गौतम