गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप १५० हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला. गुजरात विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘गुजरातमधील निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा महत्त्वाचा असेल. याशिवाय विकासाच्या मुद्यावरही पक्षाकडून लक्ष केंद्रीत केले जाईल,’ असे शहांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

घराणेशाहीच्या मुद्यावरुन अमित शहांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. ‘भाजप कोणत्याही कुटुंबाचा पक्ष नाही. पक्ष म्हणजे फक्त मी एकटा नाही. तर बहुसंख्य कार्यकर्ते म्हणजे पक्ष आहे. अनेक कार्यकर्त्यांनी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि त्यांच्या क्षमतेमुळे पक्षात खूप वरपर्यंत पोहोचलो,’ अशा शब्दांमध्ये अमित शहांनी घराणेशाहीवर भाष्य केले. देशातील दोन तृतीयांश राज्यांमध्ये भाजप सत्तेवर असल्याबद्दलही शहांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना हे पक्षाचे मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले. ‘निवडणुकीच्या राजकारणात भाजप पहिल्यांदाच इतका यशस्वी ठरला आहे. मात्र हे फक्त तीन वर्षांमध्ये शक्य झालेले नाही. १९५० पासून कित्येक नेत्यांनी पक्षासाठी त्यांचे आयुष्य समर्पित केले होते. त्यामुळेच आज पक्ष इथपर्यंत पोहोचला आहे,’ असे त्यांनी सांगितले.

निधीच्या कमतरतेमुळे देशातील रेल्वेची अवस्था दयनीय असताना बुलेट ट्रेनची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मुद्यावरही अमित शहांनी सरकारची बाजू मांडली. ‘जेव्हा पंतप्रधान मोदी देशाचा विकास होत आहे असे म्हणतात, तेव्हा त्याबद्दलचे वातावरण दिसून येणे महत्त्वाचे आहे. यामुळे विकासाचा वेग वाढतो आणि तरुणांना प्रेरणा मिळते,’ असे त्यांनी म्हटले. प्रत्येक राज्याचा दौरा करताना कार्यकर्त्यांच्या घरी करण्यात येणाऱ्या भोजनाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. ‘कार्यकर्त्यांच्या घरी भोजन करण्यावर माझा भर असतो. मग तो कार्यकर्ता दलित असो किंवा आदिवासी, त्याने काहीच फरक पडत नाही. ही माझ्यासाठी नित्याची बाब आहे,’ असे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जात आहे का, असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, ममता बॅनर्जींच्या अनेक निर्णयांमधून मुस्लिमांचे लांगुलचालन होत असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. ‘केरळ आणि बंगालमधील जनतेने तेथील सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावे. हिंसेचे राजकारण हवे की सकारात्मक राजकारण हवे, याचा निर्णय तेथील लोकांनी घ्यायचा आहे,’ असेही त्यांनी म्हटले.