सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अद्यापही देशातील विविध भागांमध्ये निषेध आंदोलने, मोर्चे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनतेला भडकावत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचं आव्हानंही दिलं आहे. यावर माजी गृहमंत्री, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शहा यांच्यावर पलटवार केला आहे. “संसदेत विरोधकांच्या एकाही प्रश्नाला उत्तरं न देणारे अमित शाह आता राहुल गांधींना चर्चेचं आव्हान देत आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.

केरळची राजधानी थिरुवअनंतपुरम येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. चिदंबरम म्हणाले, “अमित शाह यांनी मागं जाऊन पुन्हा एकदा सुधारित नागरिकत्व कायद्यावर राज्यसभा आणि लोकसभेत झालेल्या चर्चा ऐकाव्यात. त्यांनी त्यावेळी विरोधकांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही. आता तेच शाह राहुल गांधी यांना चर्चेच आव्हान देत आहेत. या कायद्याबाबत सरकारने सर्वकाही चुकीच केलं आहे.”

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या विधानावरुनही यावेळी चिदंबरम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “डीजीपी आणि लष्करप्रमुख जनतेला सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सरकारला पाठींबा देण्याचे आवाहन करीत आहेत. लष्करप्रमुखांनी असं आवाहन करणं हे लाजिरवाणं आहे. माझं जनरल रावत यांना आवाहन आहे की, तुम्ही लष्काराचे प्रमुख आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावरच लक्ष केंद्रीत करा. ज्याप्रमाणे युद्ध कसं लढावं हे लष्कराला सांगायचं आमचं काम नाही. तसंच राजकारण्यांनी काय करावं हे लष्करी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगण्याचं काम नाही.”

आणखी वाचा – जमावाला जाळपोळ व हिंसाचारास प्रवृत्त करणे म्हणजे नेतृत्व नव्हे

लष्करप्रमुख रावत म्हणाले होते, “नेत्याची ओळख ही त्याच्या नेतृत्वावरुनच करता येते. जर तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात तर तुमच्या मागे सर्वजण येतील. नेता तोच असतो जो लोकांना योग्य दिशेला घेऊन जातो. सध्या जे आपण पाहतोय की कॉलेज आणि विद्यापीठातले विद्यार्थी रस्त्यावर उतरुन निदर्शने करीत आहेत. त्यामुळे हिंसाचाराच्या आणि जाळपोळीच्या घटना वाढत आहेत. हे काही नेतृत्व नाही.” रावत यांच्या या विधानामुळे त्यांना टीकेचे धनी व्हायला लागले. यापूर्वी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देखील यावरुन रावत यांच्यावर टीका केली आहे.