महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची ओळख एक दिग्गज व्यावसायिक म्हणून तर आहेच पण एक दिलदार व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख सर्वश्रूत आहे. आतापर्यंत अनेकांची मदत महिंद्रा यांनी केली, आणि आता या यादीमध्ये आणखी नाव जोडलं गेलं आहे. हे नाव आहे जैसल के. पी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाऊस आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळमध्ये अनेकांना वाचवणाऱ्या मच्छिमार जैसलला, आनंद महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली मराझो ही शानदार कार भेट दिली आहे. 32 वर्षीय जैसल हा तोच मच्छिमार आहे ज्याने पुरामध्ये अडकलेल्यांना बोटीत जाता यावं यासाठी सिनेमातील प्रसंगाप्रमाणे, स्वत:च्या पाठीची वाट करुन दिली होती, आणि सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि सर्वच स्थरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. या घटनेनंतर केरळचे कामगार मंत्री टी पी रामकृष्णन यांनी जैसलला सन्मानित करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता आनंद महिंद्रा यांनीही जैसलची दखल घेतली आहे. मात्र, केवळ घोषणा करण्याचं काम न करता महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्र माराझो देऊन त्याचा गौरव केला आहे. केरळमधील कालिकत इथे केरळच्या कामगार मंत्र्यांच्या हस्ते या कारची चावी जैसलला सोपवण्यात आली. यापूर्वीही केरळमधील एका रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक दिला होता.  तर, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूलाही त्यांनी महिंद्राची TUV300 ही गाडी दिली होती.


 
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने काही दिवसांपूर्वीच एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) प्रकरातील ‘माराझो’ गाडी लॉन्च केली आहे. या गाडीचे अनेक भन्नाट फिचर्स आहेत. गाडीचा आगळा वेगळा डॅशबोर्ड, इन्स्टुमेन्ट क्लस्टर, एसी व्हेन्ट्स आणि सीट आकर्षक आहेत. मात्र सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे छताला असलेले एसी व्हेन्ट्स. भारतात अशाप्रकारे मध्यभागी एसी व्हेन्ट्स असलेली ‘माराझो’ ही पाहिलीच गाडी ठरली आहे. डॅशबोर्ड हा सेंट्रलाइज कंन्सोल्स असणारा टी शेपमध्ये आहे. डॅशबोर्डवरच ७ इंचाची इन्फोर्मेशन टच स्क्रीन देण्यात आली असून त्यामध्ये अॅपल कारप्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. एक्सयुव्ही ५०० आणि केयुव्ही १०० नंतरही ही महेंद्राची सर्वात प्रिमियम कार असणार आहे. नावाला साजेसे डिझाइन करण्याच्या दृष्टीने या गाडीचे डिझायनिंग करताना त्यामध्ये शार्क ग्रील्स, शार्कच्या शेपटीच्या आकाराचे टेल लाइट्स, शार्क फीन अॅण्टीना असे भन्नाट लुक्स देण्यात आला आहे. या गाडीमध्ये १.६ लीटरचे डिझेल इंजिन आहे. या गाडीमध्ये सहा ऑटो गेअर किंवा सहा मॅन्यूअल गेअरबॉक्स आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra gifts a latest mpv mahindra marazzo to fishman of kerala jaisal
First published on: 12-09-2018 at 11:47 IST