महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा १ एप्रिल २०२० पासून आपल्या पदावरुन पायउतार होणार आहेत. त्यानंतर ते गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेले पवन गोयंका यांची पद्दोन्नती होणार असून १ एप्रिल २०२० पासून ते व्यवस्थापकीय संचालक (एमडी) – मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्विकारतील. गोयंका ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील.

कंपनीच्या गव्हर्नन्स नॉमिनेशन अॅण्ड रेम्युनरेशन कमिटीच्या (जीएनआरसी) शिफारसींनुसार, संचालक मंडळाने शुक्रवारी या बदलाला मंजुरी दिली. स्वतः आनंद महिंद्रा यांनीही ही माहिती देणारे ट्विट केले आहे. कंपनीने सांगितले की, पुढील १५ महिन्यांत अनेक अधिकारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आनंद महिंद्रा हे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शकाची भुमिका निभावतील.

ग्रुप प्रेसिडंट असलेले अनिष शाह १ एप्रिल २०२० पासून मुख्य फायनान्शिअल अधिकारी (सीएफओ) हे पद सांभाळतील. सध्याचे सीएफओ व्ही. एस. पार्थसारथी १ एप्रिल २०२० रोजी आपल्या पदावरुन निवृत्त होतील. त्यानंतर २ एप्रिल २०२१ रोजी अनिष शाह एमडी आणि सीईओ होतील. त्यानंतर या पदावर त्यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२५ पर्यंत कायम राहिल.

गैरकार्यकारी अध्यक्षांच्या रुपात आनंद महिंद्रा कंपनीसाठी एका संरक्षकाची भुमिका निभावतील. तसेच रणनीती योजनांच्या प्रकरणांमध्ये संचालक मंडळाला मार्गदर्शन करतील.