जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या उत्तर प्रदेशमधील दोन जवानांच्या कुटुंबीयांना योगी आदित्यनाथ सरकारने २५ लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.

अनंतनागमधील के. पी. रोडवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पथक बुधवारी संध्याकाळी गस्त घालत होते. यादरम्यान, मोटारसायकलवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार करत हातबॉम्ब फेकले. यात पाच जवान शहीद झाले. चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, दुसऱ्या दहशतवाद्याने पलायन केल्याचे सांगण्यात आले. या शहीद जवानांमध्ये उत्तर प्रदेशमधील दोन जवानांचा समावेश होता. या दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना योगी आदित्यनाथ सरकारने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

एएसआय निरोद शर्मा, एएसआय रमेश कुमार, कॉन्स्टेबल संदीप यादव, कॉन्स्टेबल सतेंद्र कुमार, कॉन्स्टेबल महेश कुमार कुशवाहा अशी या पाच शहीद जवानांची नावे आहेत. यातील निरोद शर्मा हे आसामचे आणि रमेश कुमार हे हरयाणातील झज्जर येथील रहिवासी होते. तर संदीप यादव हे मध्य प्रदेशमधील रहिवासी होते. सतेंद्र कुमार, महेश कुमार कुशवाहा हे दोघे उत्तर प्रदेशमधील रहिवासी होते.

दरम्यान, अल-उमर-मुजाहिदीन या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी  ते जैश-ए-महम्मद या संघटनेशी संबंधित असल्याचे मानले जाते.