आंध्र प्रदेशात यंदा मान्सूनचा पाऊस ४० टक्के कमी पडला असून लागवडीचे क्षेत्रही कमी झाले आहे, त्यामुळे पर्जन्यदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने तिरूमला तिरूपती देवस्थानमला मंदिरांमध्ये यज्ञ करण्याचा आदेश दिला आहे.
प्राचीन शास्त्रांचा आधार घेऊन सरकारने म्हटले आहे, की पावसासाठी यज्ञ केल्याने जनतेचे कल्याण होते, जमिनीची सुपीकता वाढते व पाऊसही पडतो, त्यामुळे समाजात आरोग्य व सुखसमृद्धी नांदते. तिरूमला तिरूपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी यांना यज्ञ, अभिषेक करण्याचे आदेश देण्यात येत असून मान्सूनमध्ये चांगला पाऊस पडावा हा हेतू त्यात आहे, समाजाला जेव्हा काही फायद्यांची गरज असेल, तेव्हा असे यज्ञ करीत जावे, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की नेल्लोर-कुर्नूल, कडाप्पा, चित्तूर व अनंतपूर या चार जिल्ह्य़ांत ३९.२ टक्के कमी पाऊस पडला आहे.
पाऊस पडण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश हा हास्यास्पद असल्याचे पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे. आजच्या काळात यज्ञ वगैरे प्रकार हास्यास्पद आहेत, पाऊस पडणे हे हवामानावर अवलंबून असते. दुष्काळ हे हवामान बदलांमुळे पडतात, तसे घडण्याची काही शास्त्रीय कारणे आहेत, असे दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हरॉनमेंटने म्हटले आहे. आपल्याकडे जल व शेतीचे व्यवस्थापन होत नाही, हे आम्ही वेळोवेळी सांगितले असूनही खरी उत्तरे शोधण्याऐवजी राज्य सरकार असे का करीत आहे, असा सवाल प्रवक्तयांनी उपस्थित केला.