मोबाईल नेटवर्कअभावी काळ्या पाण्याची शिक्षा

स्कुबा डायिव्हग, स्नॉर्किलग, वॉटर स्पोर्ट्ससारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अंदमान २१ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीपासून अद्यापही दूरच आहे. सक्षम मोबाईल नेटवर्कअभावी अंदमानातील नागरिकांसह विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या साहित्यप्रेमींना काळ्या पाण्याच्या शिक्षेचा अनुभव घ्यावा लागत आहे.
अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथील चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी दाखल झालेले साहित्यिक आणि साहित्यप्रेमी रसिकांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीअभावी बरीच गरसोय होत आहे. त्यांना आपल्या नातेवाइकांशी संवाद साधणेही अवघड झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने दिलेला मोबाईल हातामध्ये असूनही कनेक्टिव्हिटी नसल्याने संभाषण साधता येत नाही हे वास्तव अनेकांना अंदमानमध्ये आल्यानंतरच समजले. येथे मोबाइलला रेंज आहे. मात्र, टुजी नेटवर्कवरच समाधान मानावे लागते. तेही पुरेसे सक्षम नाही. काही साहित्य रसिक रेल्वेने प्रवास करून चेन्नईला पोचले. चेन्नईत मिळणारी उत्तम कनेक्टिव्हिटी अंदमानात दाखल झाल्यानंतर मिळत नसल्याचे निदर्शनास आले. मात्र, मोबाईल नेटवर्क मिळणार नसल्याची पूर्वकल्पना असलेल्यांनी संवादासाठी तात्पुरत्या स्वरूपाची तजवीज करून ठेवली होती. मात्र, त्यांनाही कनेक्टिव्हिटीचा त्रास सहन करावाच लागला. अकार्यक्षम नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे वृत्तवाहिन्या व पत्रकारांचीही मोठी गरसोय झाली. विश्व संमेलनाला उपस्थित राहू न शकलेल्या साहित्यप्रेमींना घरबसल्या संमेलन पाहता यावे या उद्देशाने वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या तयारीने आले होते.
मात्र, नेटवर्कच नसल्याने त्यांना थेट प्रेक्षपण करता आले नाही. परिणामी, विश्व साहित्य संमेलन जगभरात जाणे दूरच; महाराष्ट्रातही योग्य रितीने पोहोचू शकले नाही.