अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांतर आपल्याला दु:ख झालं असल्याची प्रतिक्रिया ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिली. दिल्लीतल्या ‘आप’ सरकारमधले मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर सत्येंद्र जैन या दुसऱ्या एका आप नेत्याकडून दोन कोटी रूपये स्वीकारल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर कपिल मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली.

अण्णा हजारेंनी मात्र या आरोपांवरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे

“मी गेली ४० वर्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा दिला आहे. मी आणि अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आहोत. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’मुळेच अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले. पण आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आऱोप होत आहेत. माझ्याकडे शब्दच नाहीत.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते राळेगण सिध्दीमध्ये बोलत होते.

दरम्यान हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कपिल मिश्रा यांनी केली आहे.
शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर रविवारी आपण गौप्यस्फोट करु अशा आशयाचे ट्विट कपिल मिश्रांनी केले होते. रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. यानंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले.

‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला.