केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करणे ही फक्त औपचारिकता आहे अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. या सरकारला लोकांच्या प्रश्नांमध्ये काहीही स्वारस्य नाही. देशात अनेक प्रश्न आहेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. मात्र केंद्र सरकार या सगळ्या पासून लांब पळते आहे असेही खरगे यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि त्यातील कामकाज हे सुरळीत चालावे ही सरकारचीच इच्छा नाही असाही आरोप खरगे यांनी केला.

येत्या हिवाळी अधिवेशनात आम्ही जीएसटी (वस्तू आणि सेवा कर), नोटाबंदी, दहशतवाद आणि हाफिज सईद या विषयांवर सरकारला धारेवर धरणार आहोत असेही खरगे यांनी म्हटले आहे. संसदीय कामकाज समितीने संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत घ्यायचे ठरवले आहे. या अधिवेशनात महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन १४ दिवसांचे असणार आहे. २५ आणि २६ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असणार आहे असेही अनंतकुमार यांनी स्पष्ट केले. पी.व्ही. नरसिंहाराव पंतप्रधान असताना आणि मनमोहन सिंह पंतप्रधान असताना निवडणुका आल्यास हिवाळी अधिवेशनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आत्ताच त्या पुढे ढकलल्या जात आहेत असा कांगावा विरोधक कारण नसताना करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.