बांगलादेशात इस्लामी अतिरेक्यांनी तिसऱ्या ब्लॉगरची हत्या केली. ईशान्य बांगलादेशात त्याच्या घरी जाऊन त्याला कोयत्याने ठार करण्यात आले. मुस्लीम बहुल देशात धर्मनिररेक्ष ब्लॉगरची हत्या होण्याची फेब्रुवारीपासून ही तिसरी वेळ आहे.
अनंता बिजॉय दास असे या ब्लॉगरचे नाव आहे. चेहरा झाकलेल्या व्यक्तींनी सुदीबझार या सिल्हेटमधील भागात त्याच्या घरी जाऊन सकाळच्या वेळी तो कार्यालयात निघाला असताना त्याच्यावर कोयत्याचे वार केले, असे पोलिसांनी सांगितले.
प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्याने सांगितले, की हल्लेखोरांनी मागून त्याच्या डोक्यावर कोयत्याचे वार केले व तो लगेच मृत्युमुखी पडला. दास याचा मित्र शाहीदुझमान पापलू याने सांगितले, की अनंता बिजॉय दास हा आपला चांगला मित्र होता. तो भौतिकतावाद व तर्कशास्त्र यावर ब्लॉग लिहीत असे. अविजित रॉय यांच्या पुस्तकाला त्याने प्रस्तावना लिहिली होती. अविजित रॉय हे ब्लॉगर होते व त्यांची पहिल्यांदा बांगालदेशात संशयित इस्लामी अतिरेक्यांनी हत्या केली होती.
अल काईदाच्या भारतीय उपखंडातील शाखेने रॉय यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर ओयासिगूर रहमान या ब्लॉगरची त्याच पद्धतीने मारेक ऱ्यांनी हत्या केली होती, त्या वेळी दोन संशयितांना पकडण्यात आले होते. बांगलादेश हा अधिकृतपणे धर्मनिरपेक्ष देश असला तरी तेथील १६ कोटी लोक हे मुस्लीम आहेत.