आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी  पाकिस्तानात गेला असता विनाकारण पकडला गेलेल्या हमीद निहाल अन्सारी याला पाकिस्तानी तुरुंगातून मंगळवारी सोडून देण्यात आले असून त्याला भारतात परत पाठवण्यात येणार आहे. सहा वर्षांपूर्वी तो पाकिस्तानात गेला असता तेथील गुप्तचरांनी त्याला अटक केली होती.

ऑनलाइन मैत्री झालेल्या मुलीला भेटण्यासाठी अन्सारी हा पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी म्हणजे २०१२ मध्ये त्याला अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करताना अटक करण्यात आली होती. नंतर त्याला लष्करी न्यायालयाने तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली. त्याच्याकडे पाकिस्तानचे खोटे ओळखपत्र होते. ३३ वर्षे वयाचा अन्सारी हा मुंबईचा रहिवासी असून त्याला पेशावर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याचा तीन वर्षांचा तुरूंगवासही संपला होता, पण कायदेशीर कागदपत्रे नसल्याने तो भारतात येऊ शकत नव्हता. गुरुवारी पेशावर उच्च न्यायालयाने संघराज्य सरकारला त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास एक महिन्याचा अवधी दिला होता. मरदान येथील तुरुंगातून अन्सारी याची मंगळवारी सुटका करण्यात आली असून त्याला इस्लामाबादला नेले जाणार आहे. तेथून त्याची रवानगी भारतात केली जाणार आहे. अन्सारी हा सॉफ्टवेअर अभियंता असून तो पाकिस्तानी गुप्तचरांनी ताब्यात घेतल्यानंतर बेपत्ता होता. त्याची आई फौजिया अन्सारी हिने बंदी प्रत्यक्षीकरणाचा अर्ज केला असता  तो पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असल्याचे उच्च न्यायालयास सांगण्यात आले होते. अन्सारी हा भारतीय गुप्तहेर असून तो बेकायदेशीररीत्या पाकिस्तानात आला व तो देशविरोधी कारवायांत सामील होता, असा आरोप करण्यात आला होता. पेशावरच्या दोन सदस्यीय न्यायालयाने अन्सारी याने वकील काझी महंमद अन्वर यांच्या मार्फत सादर केलेलल्या याचिकेवर सुनावणी केली. तुरूंगवास पूर्ण झाल्यानंतर अन्सारी याला तुरुंगात कसे ठेवू शकता, अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकिलांना केली. कायदेशीर कागदपत्रे तयार करेपर्यंत त्याला एक महिना तुरुंगात ठेवले आहे, असे त्यावर सांगण्यात आले.