मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदवर लाहोरमधील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणी आरोप निश्चिती केली आहे.

दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश मलिक अरशद भुट्टा यांनी सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये दहशतवादी संघटनांना पैसा पुरवल्याचा आरोप निश्चित केला आहे.

या अगोदर शनिवारी न्यायालायास हाफिज सईदविरोधात टेरर फंडिग प्रकरणी आरोपांची निश्चिती करता आली नव्हती. कारण, या मह्त्वपूर्ण सुनावणीवेळी पोलिसांना यातील एक सह आरोपीस न्यायालयासमोर सादर करता आले नव्हते. खरेतर हे धक्कादायक मानले जात होते.

पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात टेरर फंडिंगच्या आरोपाखाली पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये २३ गुन्ह्यांची नोंद केली होती आणि जमात-उद-दावाच्या प्रमुखास १७ जुलै रोजी अटक केली होती, तो सध्या लाहोरच्या तुरूंगात आहे.

आंतरराष्ट्रीय समुहाच्या दबावामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी, लश्कर-ए-तोयबा, जमात उद दावा आणि त्यांचे चॅरिटी युनिट फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआईएफ) द्वारे दहशतवाद्यांना पैसा पुरवला जात असल्याच्या पार्श्वभूमूीवर त्यांची संपत्ती आणि ट्रस्टच्या वापरासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.