तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई ईंग वेन यांनी आक्रमक भूमिका घेत थेट चीनला इशारा दिला आहे. चीनने तैवानबद्दलच्या कठोर धोरणांचा फेरविचार करावा. तैवान एक स्वतंत्र देश आहे. चीनने तैवानवर हल्ला केला तर, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्साई ईंग वेन यांनी दिला आहे. त्साई ईंग वेन यांनी ८२ लाख मतांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

चीनने या निवडणुकीत त्साई ईंग वेन यांचा पराभव कसा होईल ते पाहिले, कारण त्साई आणि त्यांचा पक्ष तैवानला चीनचा भाग मानत नाही. त्यांच्या दृष्टीने तैवान एक स्वतंत्र ओळख असलेला देश आहे. तैवान आपलाच भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे.

उद्या गरज पडली किंवा तैवानने स्वातंत्र्य घोषित केले तर, लष्करी कारवाई करुन हा भाग ताब्यात घेण्याचा चीनचा इरादा आहे. शनिवारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्साई म्हणाल्या की, “अधिकृतरित्या तैवानला स्वातंत्र्य घोषित करण्याची गरज नाही कारण तैवानचे कामकाज स्वतंत्र देशासारखेच चालते” असे सांगितले.