येत्या काही महिन्यांत वैद्यकीय जगतातील अत्यंत महत्त्वाचा शोध जाहीर होण्याची शक्यता असून, त्यात एड्सवर पूर्ण विजय मिळवल्याचे सांगितले जाईल, असा दावा डॅनिश संशोधकांनी केला आहे. यात मानवी डीएनएमध्ये एचआयव्हीचा जीवघेणा विषाणू काढून त्याला कायमचे नष्ट करण्याचे तंत्र शोधले गेले आहे. आता ते अंतिम टप्प्यात आहे.
एचआयव्हीवर अतिशय किफायतशीर दरात व सामूहिक पातळीवर वितरित करता येतील अशी औषधे यात असतील. एचआयव्हीला नामोहरम करण्यासाठी एक अभिनव धोरण आखण्यात आले असून, त्यात एचआयव्ही विषाणू मानवी डीएनएमधून काढून त्याला नष्ट करणे शक्य होणार आहे.
‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की एड्सचे प्रमुख कारण असलेल्या एचआयव्ही विषाणूवर विजय मिळवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या उपचारांच्या मानवावर चाचण्या सुरू असून, त्या अतिशय प्रभावी ठरत आहेत. प्रयोगशाळेच्या पातळीवर हे संशोधन यशस्वी झाले आहे. डीएनए पेशीत हा एचआयव्ही विषाणू सुरक्षित निवारा तयार करत असतो तेथून त्याला बाहेर काढून पेशीच्या पृष्ठभागावर आणले जाते. तो तेथे आल्यावर शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीने त्याला मारले जाते. ही प्रतिकारशक्ती काही लसी देऊन वाढवता येते. जानेवारीत प्रयोगशाळेत घेतलेल्या चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला असून, डॅनिश संशोधकांना याचा पाठपुरावा करण्यासाठी १५ लाख पौंड देण्यात आले आहेत. डॉ. सोगार्ड यांनी सांगितले, की अतिशय उमेद वाढवणारे असे हे संशोधन आहे.
एचआयव्ही विषाणू जिथे सुरक्षित राहतो तिथून त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे, असा दावा डेन्मार्कच्या आरहस विद्यापीठ रुग्णालयाचे डॉ. सोगार्ड यांनी केला. रुग्णाच्या प्रतिकारशक्ती प्रणालीला हा विषाणू ओळखता आला पाहिजे तरच तो नष्ट करता येईल, हे व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. सध्या पंधरा रुग्ण या चाचण्यात सहभागी आहेत. त्यांच्यावरचे प्रयोग पूर्ण यशस्वी झाल्यावर आणखी मोठय़ा प्रमाणावर हे प्रयोग केले जातील.