अखिलेश यादव यांच्या मंत्रि- मंडळातील काही मंत्र्यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पुन्हा एकदा केली आहे.
मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल आम्ही राज्यपालांना काही पत्रे पाठविली होती. राज्याच्या मंत्र्यांनी अशी वक्तव्ये केल्यानंतर आमच्या म्हणण्यावर आणखी काय पुरावा हवा, असे विचारून यासंबंधी आम्ही घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच झाले आहे, असा दावा मायावती यांनी केला. राज्यपालांनी आता जराही विलंब न करता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी, अशी मागणी त्यांनी केली. मायावती यांनी गेल्याच आठवडय़ात उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल.जोशी यांची भेट घेऊन राज्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती कोसळली असल्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. लडाखमधील चीनच्या घुसखोरीबद्दल केंद्राने या प्रकरणी गंभीर आणि योग्य वेळेत भूमिका घ्यावी, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल, असा इशारा मायावती यांनी दिला.