भारताचे लष्करप्रमुक बिपीन रावत यांनी डोकलाम परिसारासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर चीनकडून सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतीय लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य सीमभागातील स्थिरता आणि शांततेच्यादृष्टीने सकारात्मक नसल्याचे चीनने म्हटले. भारताने आपले लक्ष पाक सीमेवरून हटवून आता ते चीनलगतच्या सीमेवर केंद्रित करण्याची गरज आहे असे वक्तव्य रावत यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षभरात भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधात अनेक चढउतार आले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच दोन्ही देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकांनंतर हे संबंध पुन्हा रुळावर येण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारचे वक्तव्य करणे या प्रक्रियेत बाधा आणू शकते, असे लू कांग यांनी सांगितले.

चीनची अरेरावी सुरूच !, २०१७ मध्ये तब्बल ४१५ वेळा भारतात घुसखोरी

काही महिन्यांपूर्वीच डोकलाममध्ये रस्ता बनवण्याचे चीनी सैनिकांचे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले होते. यानंतर गेल्याच महिन्यात लष्कराने अरुणाचल प्रदेशात घुसलेल्या चीनी सैनिकांना माघारी फिरण्यास भाग पाडले होते. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चीनच्या सीमारेषेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याविषयी सुचवले होते. चीन शक्तिशाली देश असेल, मात्र भारतही काही कमजोर देश नाही. भारत कुणालाही आपल्या क्षेत्रात घुसखोरी करण्याची अनुमती देणार नाही, असेही रावत यांनी शुक्रवारी म्हटले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानऐवजी चीनलगतच्या सीमारेषेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, असे त्यांनी सांगितले होते. याशिवाय, डोकलाम परिसराविषयी बिपीन रावत यांनी केलेल्या विधानालाही लू कांग यांनी प्रत्युत्तर दिले. डोकलाम परिसरावरून भुतान आणि चीनमध्ये वाद आहेत, असे लष्करप्रमुखांनी म्हटले होते. मात्र, डोंगलांग हा परिसर चीनचाच आहे याची माहिती वरिष्ठ लष्कराधिकाऱ्यांना असली पाहिजे, असे लू कांग यांनी सांगितले.

यापुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांच्या बळावर, लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा दावा